nagpur samachar

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव – 2023 चे थाटात उद्घाटन

Published

on

भारत महासत्‍ता होणार याची प्रतिती देणारा हा महोत्‍सव : ज्ञानवत्‍सल स्‍वामी

नागपूर.संस्कृति,परंपरा, ज्ञानाच्‍या आधारे भारत देश महासत्‍ता होईल, महागुरू बनेल, असे जगभरातील विद्वान, तत्‍वज्ञानी म्‍हणत आहेत. या संस्‍कृती, परंपरा व ज्ञानाचे दर्शन घडवणारा हा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव त्‍याची प्रतिती देणारा आहे, असे मत स्‍वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्‍ते, समाजसुधारक प. पू. ज्ञानवत्‍सल स्‍वामी यांनी व्‍यक्‍त केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव – 2023 चे उद्घाटन शुक्रवारी स्‍वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्‍ते, समाजसुधारक प. पू. ज्ञानवत्‍सल स्‍वामी यांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून करण्‍यात आले. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्‍या या महोत्‍सवाच्‍या उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह राज्‍याचे सांस्‍कृतिक वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल तुमाने, माजी खा. अजय संचेती,  आयओसीएलचे ह्युंदाई मोटर्सचे सीएमडी उनसू क‍िम व पुनीत आनंद, महिंद्राचे प्‍लांट हेड नितीन वैद्य, डॉ. विकास महात्‍मे, प.पू. प्रेमप्रकाश स्‍वामी आ. प्रवीण दटके, आ. कृष्‍णा खोपडे, नागो गाणार, बंटी कुकडे इत्‍यादी मान्‍यवरांची उपस्‍थ‍िती होती.

आज पृथ्‍वीवर अनेक ठिकाणी मतभेद, मनभेदांमुळे हिंसा, युद्ध होताना दिसत  आहेत. ज्‍या मुल्‍यांसह आपले ऋषी, महाऋषी जगले तिच मूल्‍ये जर आत्‍मसात केली तर जगात शांतता प्रस्‍थापित होऊ शकते, असे प.पू. ज्ञानवत्‍सल स्‍वामी म्हणाले.

या बारा दिवसांच्‍या सांस्‍कृतिक महोत्‍सवामुळे तुमच्‍या जीवनात सकारात्‍मक बदल व्‍हावा, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करताना प. पू. ज्ञानवत्‍सल स्‍वामी म्‍हणाले,  आपली संस्‍कृती ही जीवनात पवित्रता निर्माण करणार असून ती या महोत्‍सवातून आत्‍मसात करता आली तर आपल्‍याला भारतीय संस्‍कृतीची अनुभूती घेता येईल.

तत्‍पूर्वी, नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते प.पू. ज्ञानवत्‍सव स्‍वामी यांचा सत्‍कार करण्‍यात आला.  महाराष्‍ट्र गीताने महोत्‍सवाचा प्रारंभ झाला. त्‍यानंतर, संस्‍कार भारती, नागपूर प्रस्‍तुत ‘महाराष्‍ट्र माझा’ हा 1100 हून अधिक कलाकारांचा सहभाग असलेला महाराष्‍ट्राची सांस्‍कृत‍िक व लोकधारा दर्शविणारा नाट्य, नृत्‍य व संगीतमय कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले तर आभार जयप्रकाश गुप्ता यांनी मानले. रेणुका देशकर यांनी संस्‍कार भारतीच्‍या कार्यक्रमाची माह‍िती दिली.

महोत्‍सवाच्‍या सफलतेसाठी  खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर कार्यरत आहेत.

भावी पिढीला संस्‍कारित करण्‍याचे ध्‍येय : गडकरी

मनोरंजनासोबतच भक्‍तीचा जागर हे यंदाच्‍या खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे वैशिष्‍ट्य असून त्‍यामाध्‍यमातून आपला इत‍िहास, संस्‍कृती, परंपरा यांचे जतन करून नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्‍याचे कार्य करण्‍याचा उद्देश आहे. लोकप्रबोधन, लोकशिक्षण, लोकसंस्‍कारावर आधारित कार्यक्रमांचे महोत्‍सवात आयोजन केले जात आहे, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत असून आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श शासक कसा असावा, याचे ते मूर्तिमंत उदहारण आहेत. शिवाजी महाराज, प.पू. ज्ञानवत्‍सल स्‍वामी सारखे महान प्रेरक वक्‍ते युवा पिढीच्‍या मन, आत्‍मा, शरीरावर संस्‍कार करतात आणि व्‍यक्‍ती निर्माणाचे कार्य घडते, असे करीत आहेत, असे नितीन गडकरी म्‍हणाले.

गडकरी जनतेच्‍या हृदयस्‍थानी :  मुनगंटीवार 

नितीन गडकरी कर्तृत्‍ववान, जिज्ञासू, विकासपुरूष आणि अष्‍टपैलू व्‍यक्‍तीमत्‍व आहेत. देशाच्‍या हदृयस्‍थानी जसे झिरो माईलच्‍या माध्‍यमातून नागपूर शहर आहे तद्वतच जनतेच्‍या हृदस्‍थानी नितीन गडकरी यांचे नाव आहे, अशा शब्‍दात सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्‍या कार्याचे कौतुक केले.

महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचे  भव्‍य दर्शन

पोवाडा, वासुदेव आदी लोककला, ढोलताशा, पारंपरिक खेळ अशा संगीत, नृत्‍य, नाटयाच्‍या माध्‍यमातून संस्‍कार भारती नागपूरच्‍या 1100 कलाकारांनी महाराष्‍ट्राच्‍या संस्‍कृतीचे भव्‍य दर्शन रसिकांना घडवले. संकर्षण क-हाडे व श्‍वेता पेंडसे यांनी संस्‍कृती, परंपरा व भक्‍तीचे रंग प्रस्‍तुत केले. या कार्यक्रमाची संकल्‍पना कांचन गडकरी व आशुतोष अडोणी यांची होती. याचे संयोजन गजानन रानडे व अमर कुळकर्णी यांनी केले होते तर संगीत संयोजन आनंद मास्‍टे यांचे होते. यात 250 गायक, 250 वादक, 100 नाट्यकलावंत, 300 नर्तक, 50 पांरपर‍िक खेळ सादर करणारे कलाकार   यात सहभागी झाले होते. 50 पथसंचलन करणारे तसेच 100 लोकांचे ढोलताशा पथकाने कार्यक्रमाला दमदार स्‍वरूप प्राप्‍त करून दिले.

आज महोत्‍सवात

सकाळी 6.30 वाजता : श्री हनुमान चालिसा पठण

सायं. 6.30 वाजता : हरहुन्‍नरी गायिका श्रेया घोषाल यांची ‘लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट’

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version