nagpur samachar

विज्ञान आणि अध्यात्माचे काम परस्परपूरक राहिले पाहिजे

Published

on

सरसंघचालक  भागवत यांचे आवाहन

नागपूर. विज्ञान आणि अध्यात्म एकमेकांच्या विरोधी नाही. या दोघांची स्पर्धाच नाही. मार्ग वेगवेगळे असले तरी दोघेही सत्याचाच शोध घेतात. हे लक्षात घेता विज्ञान आणि अध्यात्माचे काम परस्परपुरक राहिले पाहिजे असे परखड प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी यांनी येथे केले. नाना महाराज सपाद जन्म शताब्दी समापन समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. शांतीपुरूष सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबा महाराज तराणेकर अध्यक्षस्थानी होते.

श्री शांतिपुरुष सेवा संस्थेतर्फे श्री दत्तसंप्रदायातील परमपमूज्य परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे शिष्य श्री चैतन्यानंद सरस्वती नानामहाराज तराणेकर यांच्या सपाद (125 वर्षे) जन्मशताब्दी समापन समारोहाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्‍या हस्‍ते झाले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्‍हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी  शांतिपुरुष सेवा संस्थेचे अध्‍यक्ष डॉ. बाबामहाराज तराणेकर, कार्याध्‍यक्ष राजीव हिंगवे व तेजस तराणेकर यांची मंचावर उपस्थिती होती. डॉ. बाबामहाराज तराणेकर यांच्‍या हस्ते डॉ. मोहनजी भागवत व नितीन गडकरी यांचा सत्कार करण्‍यात आला.

अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे मुखपत्र ‘श्री शांतिपुरुष’ च्‍या रौप्‍य महोत्‍सवी वर्षानिमित्‍त विशेषांकाचे मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रकाशन करण्‍यात आले.डॉ. भागवत यांनी विज्ञान आणि अध्‍यात्‍म यांची उत्‍कृष्‍ट सांगड घालत कार्य करणा-या त्रिपदी परिवारच्‍या कार्याचे कौतुक केले.  आपली परंपरा सनातन असून त्‍यावेळच्‍या लोकांचा मन व बुद्धीचा स्‍तर आजच्‍या लोकांपेक्षा खूप वेगळा होता. त्‍याकाळी जे तत्‍व दर्शन झाले ते आज उलगडून दाखवण्‍याचे काम संतमहात्‍मे करत असतात.

कार्यक्रमाच्‍या सुरुवातीला रुपाली बक्षी यांनी करुणा त्रिपदी सादर केली. त्‍यानंतर अखिल भारतीय त्रिपदी परिवाराच्‍या कार्याचा आढावा घेणारी चित्रफीत प्रदर्शित करण्‍यात आली. दुस-या सत्रात रात्री कार्तिक कला अकादमी इंदूरतर्फे ‘अमृतस्‍य नर्मदा’ ही नृत्‍यनाटिका प्रस्‍तुत करण्‍यात आली. या कार्यक्रमाला कांचनताई गडकरी विशेषत्‍वाने उपस्थित होत्‍या. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोर गलांडे यांनी केले.

त्रिपदी परिवारचे लोकसेवा हे वैशिष्‍ट्य : गडकरी

अध्‍यात्‍म आणि विज्ञान याची सांगड घालून नवीन पिढीमध्‍ये व समाजामध्‍ये गुणात्‍मक परिर्वतन घडवून आणण्‍याचे कार्य त्रिपदी परिवार करीत आहे. लोकशिक्षण आणि लोकसंस्‍काराबरोबरच लोकसेवा हे देखील त्रिपदी परिवारचे वैशिष्‍ट्य आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.इंदोर येथे झालेल्‍या नानामहाराज तराणेकर यांच्‍या सपाद जन्‍मशताब्‍दी सोहळ्याच्‍या उद्घाटनाला उपस्थित राहण्‍याचा योग आला होता, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितले. नानामहाराजांचे लहानपणी अनेकदा दर्शन घेण्‍याची संधी मिळाली आहे. बाबामहाराजांनी त्‍यांचे कार्य यशस्‍वीपणे पुढे चावले आहे. विज्ञानाची जोड देऊन अध्‍यात्‍माला पुढे नेण्‍याचा काम बाबामहाराज करीत आहेत, असे  गडकरी म्‍हणाले.

आज समारोहात

मूकबधिर संस्था, शंकरनगर चौक येथे सकाळी 8.30 वाजता श्रीसद्गुरूंच्या मूर्तीस महाभिषेक. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प.पू्. बाबामहाराज तराणेकर राहणार असून प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे, सयाजी विद्यापीठ वडोदराच्‍या संस्‍कृत, पाली व प्राकृत भाषा विभागाच्‍या अध्‍यक्ष डॉ. श्‍वेता जेजुरीकर यांची उपस्थिति राहील. यावेळी राजेंद्र बेनोडेकर लिखित ‘मागोवा: प्राचीन भारताचा’पुस्तकाचे विमोचन होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version