Aaj ki Nari
नेत्री संमेलनाला नेतृत्वधारी महिलांचा भरघोस प्रतिसाद
भारताचे महिला विषयक चिंतन प्रगत आणि परिपक्व : सहस्रबुद्धे
नागपूर.वैदिक काळापासून महिलांना शस्त्र आणि शास्त्र अध्ययन, कला आणि कौशल्य याचे शिक्षण प्रशिक्षण देऊन त्यांना प्रगत आणि परिपक्व करण्याची संस्कृती आपल्याला भारतीय दर्शनात दिसून येते. ‘सर्वे सुखिनः संतु’ या तत्वावर आधारित भारतीय तत्वज्ञान स्त्रीला महत्वपूर्ण स्थान देते, असे मत भारतीय स्त्रीशक्तीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि प्रमुख वक्ता म्हणून नयना सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या उद्बोधनात व्यक्त केले.समाजातील विविध क्षेत्रात सक्षमपणे कार्य करणा-या आणि देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणा-या महिलांचे नेत्री संमेलन महिला समन्वय आणि संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्यावतीने रविवार स्थानिक रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित करण्यात आले. त्यावेळी ‘भारताचे महिला विषयक चिंतन’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर संमेलनाच्या उद्घाटक आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर,प्रमुख अतिथी म्हणून इस्रोच्या वैज्ञानिक डॉ. माधवी ठाकरे, समन्वयक अॅड. पद्मा चांदेकर, रुचिता जैन आणि श्रुती गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला 1600 पेक्षा अधिक महिलांची उपस्थिती होती.
महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याची गरज: डॉ. ठाकरे
विज्ञान, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याची आवश्यकता असल्याचे इस्रोच्या वैज्ञानिक डॉ. माधवी ठाकरे यांनी सांगितले. अनेक मुली महिला विविध विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी नोंदणी करतात. परंतु जबाबदाऱ्यांमुळे त्या ते पूर्ण करू शकत नाही. महिला घर सांभाळून काम करतात. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेत त्यांना आपली प्रतिभा वाढवावी लागेल, असे त्या म्हणाल्या.
मुलांना स्त्रीचा सन्मान करण्यासाठी शिकवावे : कानिटकर
प्रत्येक स्त्रीने आपल्यासह किमान ५ स्त्रियांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या प्रगतीत सहकार्य करावे असा सल्ला देताना डॉ. माधुरी कानिटकर यांनी कुटुंब व्यवस्थेत मुलींना संस्कारित करताना मुलांनादेखील स्त्रियांचा सन्मान करण्यास शिकवावे. स्त्रीप्रति असलेली कर्तव्य त्यांना शिकविण्याची वेळ आली असून त्यातूनच सामाजिक समतोल राखता येईल असे त्या म्हणाल्या.आपला ‘भारत’ कपड्यांवरून नाही तर संस्कृती, परंपरा व चारित्र्यावरून ओळखला जातो, असे स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेला अमेरिकेत गेले असता ठणकावून सांगितले होते.
भारत ही आपली खरी ओळख असून आज या नेत्री संमेलनात सर्व महिलांनी देशाला ‘भारत’ म्हणून संबोधण्याचा संकल्प करायचा आहे. हे आपल्या देशाच्या विकासात आपले पहिले योगदान राहील, असे आवाहन भाग्यश्री साठ्ये यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता मडावी यांनी केले. सीमा सराफ यांनी वैयक्तिक गीत सादर केले. तर श्रुती गांधी यांनी आभार मानले.